या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मंजूर..
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मंजूर:-
मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये कृषी, महसूल विभागामार्फत पीकविमा कंपनीला सोबत घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी अधिसूचना काढली आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील ८७ मंडळात २५ टक्के अग्रीम पीकविमा मंजूर झाले. त्यामुळे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे.
संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. मराठवाड्यात नांदेड व हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले होते.
त्यानंतर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी शेतकऱ्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये कृषी, महसूल विभागामार्फत पीकविमा कंपनीला सोबत घेऊन पंचनामे केले. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ८७ मंडळामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळं संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा निकष काढला. त्यानुसार अधिसूचना निर्गमित करत ८७ महसूल मंडळातील सोयाबीन, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश निर्गमित केले आहेत. या अग्रीम पीक विम्याचे एका महिन्यात वितरण होणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा